ST Employees Da Allowance : एसटी कर्मचारी महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत ! फाईल मंत्रालयात धूळखात पडून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST Employees Da Allowance : मोठा गाजावाजा करत एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या सांगता समारंभात केली.

मात्र दोन महिने उलटले तरी यासंदर्भातील कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर यासंदर्भातील फाईल मंत्रालयात धूळखात पडून असल्याचा आरोप एसटी संघटनांकडून करण्यात येत आहे.

१४ जून रोजी एसटीच्या सुवर्ण महोत्सवी उत्सव समारंभात लवकरच एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता देण्याची जाहीर घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही अद्याप याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे.

एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे गेली अनेक वर्षे महागाई भत्ता दिला जातो. प्रत्यक्षात मात्र अजूनही एकूण ८ टक्के थकित महागाई भत्ता अद्याप कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही.

दुर्दैव म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सुद्धा या संदर्भातील फाईल दोन महिन्यांपासून सरकार दरबारी धूळखात पडून असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार संवेदनशील नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे,

असा आरोपही संघटनेचे सरचिटणीस बरगे यांनी केला आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ४२ टक्के इतका महागाई भत्ता मिळत असून त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळायला हवा होता. पण एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप ३४ टक्के इतकाच महागाई भत्ता मिळत आहे, ही गंभीर बाब आहे.

निधीअभावी भविष्य निर्वाह निधी, उपदान, अशी मिळून अंदाजे ८०० कोटी रुपयांची रक्कम अद्यापही ट्रस्टकडे भरणा करण्यात आलेली नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांनी घेतलेले बँक कर्ज, पतसंस्था कर्ज व इतर देणी संबंधित संस्थांना देण्यात आलेली नाहीत.

एसटीकडे निधीची कमतरता असल्याने ही रक्कम सरकारकडून मिळावी, यासाठी या भत्त्यातील पहिल्या टप्यातील ४ टक्के महागाई भत्ता देण्यासंदर्भातील प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वीच सरकारकडे पाठवण्यात आला असून अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही.

एकूण ८ टक्के महागाई भत्ता मिळणे बाकी आहे. असे असताना प्रचंड वाढलेल्या महागाईत कर्मचारी त्रस्त असताना सरकार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

थकित ८ टक्के महागाई भत्त्याच्या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचा नेहमी प्रमाणे अपेक्षाभंग होऊ नये. एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता मिळण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवावी. – श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस