महाराष्ट्र

सहा वर्षांनंतर एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार गणवेश कापड

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : एसटी महामंडळातील चालक व वाहकांना गेल्या ६ वर्षांपासून गणवेश पुरवण्यात आला नाही. २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीचे तयार गणवेश मिळाले, मात्र ते अमान्य असल्याने पुन्हा पाठवण्यात आले.

त्यानंतर गतवर्षी पुन्हा यासाठी निविदा प्रक्रिया राबवत अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत कोणतीही उत्सुकता दिसून येत नाही.

कारण गेल्या ६ वर्षांत कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने गणवेश शिवल्याने त्या कालावधीतील खर्च एसटी महामंडळ देणार का? गणवेश कापड मिळाले तरी ते किती जोड्या मिळणार, असे प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, याबाबत एसटी महामंडळाशी संपर्क साधला असता, संपर्क झाला नाही.

२०१६ पर्यंत कर्मचाऱ्यांना प्रशासनातर्फे कापड व शिलाई भत्ता दिला जायचा. यामध्ये कर्मचाऱ्यांना दोन गणवेश व्हायचे. २०१७ पासून ही पद्धत बदलण्यात आली. चालक, वाहक, अधिकारी यांच्या गणवेशाच्या रंगात फरक करण्यात आला, तसेच कर्मचाऱ्यांना शिवलेला तयार गणवेश देण्यात येऊ लागला, असे दोन गणवेश वर्षातून मिळायचे.

मात्र, २०१९ पासून कर्मचाऱ्यांना गणवेशच मिळाला नाही. तत्कालीन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २०१७ मध्ये एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक यांचा गणवेश बदलण्याची योजना आखली होती.

नव्या डिझाइनच्या गणवेशासाठी नवी मुंबई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेशी करार करून डिझाईन बनवले. त्यासाठी कामगार संघटनांची सहमती घेऊन १३ संवर्गातील सुमारे ७० हजार कर्मचाऱ्यांना वर्षाचे दोन तयार गणवेश दिले. यानंतर झालेल्या संप काळात २०२२ मध्ये गणवेशाचे कापड पुरवण्यासह १८ मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.

नवीन करायला गेले आणि फसले

यापूर्वी कापड व शिलाई मिळत असे, मात्र तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात ड्रेसकोड ही संकल्पना पुढे आणण्यात आली. याने खर्चही दुप्पट झाला आणि जे ड्रेस कोड दिले ते कर्मचाऱ्यांच्या पसंतीला उतरले नाहीत. वाहक मुलींना शाळकरी मुलींसारखे ड्रेस दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ना पसंती होती व ते ड्रेस कोणी घातले नाहीत.

अशातच यातील ६०० टक्के गणवेशांची मापे चुकली. रंग वेगवेगळे झाले. कापडाचा दर्जा फिस्कटला. काहीतरी नवीन बदल करायला गेले, मात्र विनाचर्चा हा निर्णय घेतल्याने हा निर्णय पूर्णतः फसला.

त्या वेळी एसटी कर्मचारी संघटनांनी संयुक्त विचारविनिमय बैठकीमध्ये उच्च प्रतीचे कापड व त्याची शिलाई मिळावी, अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे केली. ती प्रशासनाने मान्य करत गतवर्षी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.

गेल्या ६ वर्षांतील शिलाई भत्ता, कापडाचे पैसे द्या

एसटी कर्मचारी अल्प वेतन आणि मधल्या काळात कोरोना प्रादुर्भाव, एसटी संप आणि त्यानंतर विविध मागण्या प्रलंबित असल्याने पिसून निघाला आहे. अशातच गेल्या ६ वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश मिळाला नसल्याने स्व खर्चाने गणवेश शिवावे लागले.

२०१७ नंतर थेट २०२४ मध्ये गणवेशाचे कापड आणि शिलाई भत्ता एसटी महामंडळाकडून देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ६ वर्षांत कर्मचाऱ्यांना लागलेला भूर्दंड एसटी महामंडळाने भरून द्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

■बऱ्याच वर्षानंतर गणवेश कापड आणि शिलाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मात्र, गेली ६ वर्षांत कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने गणवेश घेतले आहेत त्याचे काय? त्याचा खर्च कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने द्यावा. -श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office