महाराष्ट्र

आजपासून एसटी कर्मचारी करणार आंदोलन ! सातवा वेतन आयोग….

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : आजपासून म्हणजेच सोमवार, ६ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ८५ टक्के एसटी बसेसचा विमा नसल्याने कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे,

तर दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने एसटी कष्टकरी जनसंघामार्फत सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी राज्यभरात चक्का जाम करण्यात येणार असल्याचे जनसंघाचे प्रमुख गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

एसटी महामंडळाकडून अद्याप नव्या एसटी बसेस दाखल करण्याचे प्रमाण तुटपुंजे आहे. ५४ लाख प्रवासी संख्या असताना तुलनेने केवळ १२ हजार बसेस एसटीच्या ताफ्यात धावत आहेत.

यापैकी बहुतांश बसेसची अवस्था बिकट असून बऱ्याच गाड्या खिळखिळ्या झाल्या आहेत, तर ८५ टक्के एसटी बसेसचा अद्याप विमा काढण्यात आलेला नाही. यामुळे एसटी वाहक, चालक यांच्यासह प्रवाशांचे आयुष्य धोक्यात असल्याचे एसटी कष्टकरी जनसंघाचे प्रमुख सदावर्ते यांनी सांगितले.

दरम्यान, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास शासन आणि एसटी महामंडळ टाळाटाळ करत असल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असल्याचेदेखील सदावर्ते यांनी सांगितले. या सर्व मागण्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, ६ नोव्हेंबरपासून राज्यभरात चक्का जाम करण्यात येणार असल्याचे जनसंघाकडून सांगण्यात आले.

या आहेत प्रमुख मागण्या

■अनधिकृत रसवंतीगृह बंद करा

■नाथजल पाणी बॉटल विना आयएसआय मार्किंगसह विक्री होत आहे ते तत्काळ थांबवा

■एसटी बसेसचा विमा उतरवण्यात यावा

■खिळखिळ्या झालेल्या एसटी ताफ्यातून काढून टाकाव्यात

विलीनीकरण समिती स्थगित करा

एसटीचे विलीनीकरण व्हावे यासाठी काही महिन्यांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यभरात बंद पुकारण्यात आला होता. या काळात १२४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र विलीनीकरणाबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.

यामुळे याबाबतची समिती स्थगित करत याबाबत पुनर्विचार व्हावा, अशी मागणी एसटी कष्टकरी जनसंघाकडून करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office