एसटी कर्मचाऱ्यांना ७ तारखेला वेतन मिळणे आवश्यक असताना १० तारीख उलटूनही अद्याप कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. सवलत प्रतिपूर्तीची ३५० कोटींची रक्कम शुक्रवार, १० मे रोजी एसटी महामंडळाला प्राप्त झाली. मात्र वेतन येण्यासाठी सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. सुमारे ८७ हजार एसटी कर्मचारी वाऱ्यावर असून यंदा तब्बल ५-६ दिवस उशिराने कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे.
दरम्यान, या कालावधीत अक्षय्य तृतीयेसारखा सण बिनवेतनाचा गेल्याने कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या आणि एसटी महामंडळाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ८७ हजार कर्मचारी व अधिकारी यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वर्षानुवर्षे वेतन मिळत आहे. पण हल्ली संप व कोरोनापासून कधी वेळेवर वेतन मिळालेले नाही.
संपानंतर मात्र न्यायालयात दिलेल्या आश्वासनानुसार ७ तारीख उलटली तरी निदान १० तारखेपर्यंत वेतन मिळत आहे. तशी हमी राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली आहे. तथापि, या महिन्यात मात्र १० तारीख उलटून गेली तरी वेतन मिळालेच नाही. कारण प्रवासी कराची ७८० कोटी रुपये इतकी रक्कम भरणा करण्याची अट शासनाने घातली होती.
त्यावर ही रक्कम चार हप्त्यांत शासनाला टप्प्याटप्प्याने भरणा करू, तसे लेखी कळवूनसुद्धा अर्थ खात्यात फाईल निर्णयाविना पडून राहिल्याने वेतन रखडले. वेतन १० तारखेस न झाल्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला असून, याला सरकारचे अर्थ खात्यातील अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोप बरगे यांनी केला आहे. याबाबतीत कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले