१ डिसेंबरपासून ‘गाव तेथे उपोषण’ आंदोलन करा – मनोज जरांगे-पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहेच. मात्र, सरकारवर दबाव वाढवण्यासाठी १ डिसेंबरपासून मराठा समाजाने ‘गाव तेथे उपोषण’ आंदोलन सुरू करण्याचे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी महाड येथील शिवाजी चौकात घेतलेल्या सभेतून केले.

मराठा समाज हा कुणबी असल्याचे पुरावे गेली सत्तर वर्षे लपवून ठेवण्यात आले होते. मराठा समाजानेही पुरावे नसल्याच्या दाव्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे सात पिढ्यांचे नुकसान झाले. आता पुरावे सापडू लागले आहेत. मग ते कुणी लपवले होते, असा प्रश्न विचारत, पुरावे लपवणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन त्यांनी शासनाला केले.

आरक्षणाचा विषय ७० टक्के मार्गी लागला आहे. हा विजय माझा किंवा तुमचा नाही. मी केवळ निमित्तमात्र आहे. समाज एकवटला म्हणून हे यश मिळाले आहे. राजकारण जरूर करा, पण त्या आधी आपल्या लेकराबाळांचे भविष्य सुरक्षित करा. मराठा आरक्षणासाठीचा हा पहिला आणि शेवटचा लढा आहे. त्यामुळे संयमाने परिस्थितीला सामोरे जा, असे आवाहन त्यांनी केले.

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करत असलेल्या छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता शेलक्या शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हातारे झाले आहेत. वयोमानानुसार त्यांची विचारशक्ती गेली आहे. त्यांना राजकीय स्वार्थ साधून घ्यायचा आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, असा सल्लादेखील त्यांनी शेवटी मराठा समाजाला दिला.

महाड शहरात आगमन झाल्यानंतर मनोज जरांगे-पाटील प्रथम चवदार तळे येथे गेले. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सभास्थळी नेण्यात आले. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी भाषणाला सुरुवात केली.

आ. गोगावलेंकडून स्वागत

मनोज जरांगे-पाटील हे किल्ले रायगडवर अनवाणी पायांनी पायरी मार्ग चढून गेले आणि अनवाणी पायांनीच गड उतरले. गडावरून उतरल्यानंतर महाडचे आ. भगत गोगावले यांनी किल्ले रायगडच्या पायथ्याला मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन रायगड जिल्ह्यात त्यांचे स्वागत केले.