महाराष्ट्र

दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान ! असा घ्या अनुदानाचा लाभ घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करुन दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला असला, तरी ५ रुपयांच्या अनुदानासह दुग्ध व्यवसायातील इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी

दूध उत्पादकांनी शासनाच्या भारत पशुधन अॅपवर आपली नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांनी केले.

येथील गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर कोपरगाव व राहाता तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, कृत्रिमरेतन तज्ज्ञ यांच्यासाठी भारत पशुधन अॅपबाबत माहिती देण्यासाठी नुकतेच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. तुंबारे यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा कृत्रिमरेतन केंद्राचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर, सह आयुक्त डॉ. अनिल तांबे, डॉ. दिलीप दहे, डॉ. सचिन बेंदे, डॉ. श्रद्धा काटे, डॉ. जामदार, डॉ. बाळासाहेब जिगळेकर, डॉ. सचिन वाघमारे, चंद्रकांत गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. तुंबारे म्हणाले, पशुसंवर्धन विभागाबाबत केंद्रस्तरावरुन अनेक नवनवीन योजना व उपक्रम राबविले जात आहेत. माणसाप्रमाणेच जनावरांचीही ओळख निर्माण व्हावी या हेतुने नवी पद्धत आमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी भारत पशुधन अॅप ही नवीन संगणक प्रणाली सुरु करुन त्यावर शेतकऱ्यांकडील जनावरांच्या नोंदी करण्यात येणार आहेत.

तसेच डॉ. तुंबारे यांनी भारत पशुधन अॅपवर नोंद केल्यावर दूध उत्पादकांना शासनाच्या ५ रुपये अनुदानाचा लाभ मिळेल, परंतु या ऑनलाईन नोंदीमुळे जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, जनावरांच्या खरेदी विक्रीची माहिती, जनावरांची जात आदी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे,

अशी माहिती संकलीत करुन त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने कामास सुरुवात केलेली आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व कृत्रिमरेतन तज्ज्ञांच्या गांवोगावी नेमणुका केल्या असून त्यांच्यामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याकडील पशुधनाची माहिती भारत पशुधन अॅपवर नोंदवून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. वसंत गारुडकर यांनीही भारत पशुधन अॅपबाबत प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले. यावेळी कोपरगाव तालुका लघु पशुचिकित्सालयाचे पशुधन वैद्यकीय अधिकारी, बायफ संस्थेचे अधिकारी व कृत्रिमरेतन तज्य यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

भारत पशुधन अॅपमुळे कामात सुसूत्रता

भविष्यात संगणक प्रणालीशिवाय पर्याय नाही. जनावराचे संरक्षण, त्यांची निगा, या व्यवसायासाठीच्या शासनाच्या योजना, सवलती थेट दूध उत्पादकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्याकडील जनावरांच्या नोंदी या अॅपवर समाविष्ट करणे गरजेचे आहे.

जनावरांचे टॅगींग करून त्यानुसार नंबर देण्यात येणार आहे. भारत पशुधन अॅपमुळे कामात सुसूत्रता येत असून कामाचा उरक वाढत आहे. या व्यवसायातील नियोजन करणे, धोरणात्मक निर्णय घेणे शक्य होत असल्याने दूध उत्पादकांनी आपल्याकडील पशुधनांची नोंदणी तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले.

Ahmednagarlive24 Office