महाराष्ट्र

Sarkari Yojana : घोडे, गाढव पालनास ५० लाखांपर्यंत अनुदान ! राष्ट्रीय पशुधन विकास अभियान प्रजनन केंद्रासाठी राज्यांना निधीची तरतूद

Published by
Ahmednagarlive24 Office

Sarkari Yojana : राष्ट्रीय पशुधन विकास अभियानामध्ये देशात आता घोडा, गाढव, खेचर, उंट यांच्या भरीव अनुदान योजनांचा समावेश करण्यात आला असून या प्राण्यांशी संबंधित व्यवसायासाठी ५० लाख रुपयांपर्यंत ५० टक्के भांडवली अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

विशेष म्हणजे घोडा, गाढव आणि उंटाच्या चांगल्या देशी प्रजातींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारला मदतनिधीही दिला जाणार आहे. त्याअंतर्गत या प्राण्यांचे वीर्य केंद्र आणि न्यूक्लिअस प्रजनन केंद्र उभारण्यासाठी राज्यांना १० कोटी रुपये मिळणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कें द्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय पशुधन अभियानातील या सुधारणांना बुधवारी मंजुरी दिली आहे. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, महिला बचतगट, संयुक्त बचत समूह, शेतकरी कंपन्या यासह ८ घटकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

यामध्ये उद्योजकांना चारा, बियाणे, प्रक्रियाविषयक पायाभूत सुविधांसह प्रक्रिया- प्रतवारी कक्ष व चारा साठवण गोदाम उभारण्याच्या उद्देशाने लाभार्थ्यांना इमारतीचे बांधकाम, यंत्रसामग्रीसाठी हे भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थ्याला बँकेकडून वित्तपुरवठा घेऊन अथवा स्वतःकडील पैसे खर्च करून प्रकल्पासाठी येणारा निम्मा खर्च उचलावा लागेल.

बिगर-वन जमीन, पडिक- अकृषक जमीन तसेच वन जमिनींचा वापर करून चारा लागवड क्षेत्र वाढवण्यासाठीही राज्य सरकारला आता आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे देशातील सर्वच पशुंसाठीचे चारा क्षेत्र वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.

केंद्र सरकारतर्फे २०१४-२०१५ मध्ये राष्ट्रीय पशुधन अभियानाची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये पशुधन विकास, पशुखाद्य आणि चारा विकास, संशोधन आणि पशुधन विमा यांच्याशी संबंधित १० उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

जुलै २०२१ मध्ये २३०० कोटी रुपयांच्या खर्चासह नव्या सुधारित योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यात आता नव्याने उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office