अहमदनगर : सार्वजनिक हितासाठी मी जनतेशी कटिबद्ध असून माझी बांधिलकी फक्त जनतेशी आहे. त्यामुळे नगर शहरातील व जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था आता सहनशीलतेच्या पलिकडे गेली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी व दळणवळणासाठी सुयोग्य करावेत. संबंधित सर्व विभागांनी तातडीने कामे पूर्ण करावे व लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अशी कानउघडणी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची केली.
शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी नगर येथे खा.विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकाऱ्यांची महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत डॉ.विखे यांनी शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेवून यासंदर्भात तातडीने करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात अंमलबजावणी करण्याचे सुचित केले.
शहरातुन जाणाऱ्या सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामांचा कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा. जिल्ह्यातील सर्व बाह्यवळण रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम १५ डिसेंबरपर्यंत पुर्ण करावेत, शासनाकडे प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव पाठपुरावा करुन मार्गी लावावेत अशा महत्वपुर्ण सुचना खा. विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीत डॉ.विखे यांनी रस्त्यांच्या कामाबाबत गांभिर्याने कार्यवाही करावी लागेल असे सुचित करतानाच दळणवळणाच्यादृष्टीने नगर शहरासह जिल्ह्यातील मार्ग हे सुस्थितीत असावे यासाठी संबंधित सर्व एजन्सीजने कामाचा दर्जा राखावा. अर्धवट राहिलेली रस्त्यांची सर्व कामे कालबध्द नियोजन करुन पुर्ण करावीत. शहरातील भुयारी गटारींची कामे पुर्ण करुनच रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले.