अहमदनगर :- राजकीय आखाड्यातील पट्टीचे वस्ताद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार यांनी काल सोमवार रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार तास सलग प्रदीर्घ बैठक घेतली.
विधानसभा मतदारसंघनिहाय घेतलेल्या बैठकीत थेट तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी शरद पवारांनी हितगुज केले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीतील स्थिती, एकूण मतदान, सध्याचे वातावरण अशा गुजगोष्टी करत लोकसभा निवडणुकीचा संग्राम जिंकण्यासाठी आघाडीचा धर्म पाळीत एकदिलाने काम करा, असा कानमंत्रही त्यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, नगरमध्ये पवारांनी तळ ठोकून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करत लोकसभेची परीक्षा पास होण्यासाठी सज्ज व्हा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते तुमच्यासोबत आहेत,
घाबरू नका असे सांगत राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्हीही जागा जिंकण्यासाठी जीवाचे रान करावे असे आवाहन केले.
विशेष करून नगर लोकसभा मतदारसंघाचा पवार यांनी सखोल आढावा घेतला. यात श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, राहुरी, नगर शहर आणि तालुका, शेवगाव-पाथर्डीमधील राजकीय ताकद त्यांनी जाणून घेतली.
यावेळी नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी संग्राम जगताप यांच्या उमदेवारीचे समर्थन केले आहे. तालुकानिहाय आढावा घेत्यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीसह काँग्रसेच्या तालुकाध्यक्षांकडून माहिती घेतली.