अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- वसंतराव झावरे यांचा विसर पडल्यामुळे पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत राहुल झावरे हे बेदखल झाल्याची टीका माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केली.
पं. स. सभापतिपदाची सूत्रे गणेश शेळके यांनी झावरे यांच्या उपस्थितीत स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना झावरे यांनी मावळते सभापती राहुल झावरे यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला.
ते म्हणाले, पं. स. निवडणुकीनंतर केवळ दोन सदस्य असतानाही काँग्रेस आघाडीचा धर्म पाळून आम्ही राहुल झावरे यांना सभापती संधी दिली.
पदभार स्वीकारल्यानंतर झावरे यांनी आपल्या दालनात विविध नेत्यांची छायाचित्रे लावली. माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या छायाचित्राचा मात्र त्यांना विसर पडला.
ज्यांच्यामुळे तीन वर्षे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्याविषयी कृतघ्नतेने वागणाऱ्यांना या निवडणुकीत सर्वांनीच बेदखल केले.
नवे सभापती शेळके यांनी रोहयोतून कामे हाती घ्यावीत, असे आवाहन झावरे यांनी केले. शेळके हे या सर्व गोष्टींना तिलांजली देत पारदर्शी कारभार करतील, असा विश्वास झावरे यांनी व्यक्त केला.