औरंगाबाद : इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचे भांडण राष्ट्रवादीशी होते. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचा प्रश्नच नव्हता.
हा प्रकार म्हणजे ‘दिराशी भांडण अन् नवऱ्याला घटस्फोट’, असा असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली.
भाजपा प्रवेशानंतर पाटील यांनी केलेली राष्ट्रवादीवरील टीका अनाकलनीय असल्याचेही त्या म्हणाल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यात चाचपणी सुरू आहे.
त्याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी शहरात आलेल्या खासदार सुळे यांनी मंगळवारी (दि.११) पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचा समाचार घेतला.
यावेळी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, प्रदेश सदस्य कदीर मौलाना, जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष विजय साळवे, जिल्हा शहराध्यक्ष दत्ता भांगे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, नगरसेविका अंकिता विभुते, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.