महाराष्ट्र

Mumbai News : दहीहंडीला कोसळलेल्या सुरजला डिस्चार्ज मिळेल पण पुनर्वसन कसे करायचे ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Mumbai News : दहीहंडीला थरावरून कोसळलेल्या २५ वर्षीय सूरज कदमवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला येत्या दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज दिला जाणार आहे. मात्र असे असले तरी डिस्चार्ज झाल्यावर त्याची भावंडे त्याला घरी कशी सांभाळतील ? असे अनेक प्रश्न सूरजच्या कुटुंबासोबत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनादेखील पडले आहेत.

सूरज हा पूर्वी काम संभाळून नित्यनियमाने दहीहंडीच्या सरावाला जात असे. मात्र सुरज दहीहंडीच्या थरावरून कोसळून जबर जखमी झाला. पाठीच्या कण्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहे.

२४ सप्टेंबर रोजी संकुचित झालेल्या नसा आणि फ्रेंक्चरसाठी शस्त्रक्रिया करून जवळपास तीन आठवडे आयसीयूमध्ये उपचार घेऊन सूरजला केईएमच्या ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये हलवण्यात आले.

डॉक्टर त्याला काही दिवसांत डिस्चार्ज देणार आहेत. रुग्णालयाकडून मिळालेल्या १ लाख रुपयांशिवाय कुटुंबाला फारशी आर्थिक मदत मिळालेली नाही. मात्र आता त्याच्यावर काही किरकोळ उपचार केले जात असून वैद्यकीयदृष्ट्या सूरजला डिस्चार्ज देता येऊ शकेल, असे केईएम रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.

रुग्णालयाप्रमाणे त्यांना घरीदेखील काळजी घ्यावी लागेल. त्याच्या शरीराची सतत हालचाल, त्याच्या आहारावर लक्ष, फुफ्फुसाचे आणि किडनीचे आजार होऊ नये, म्हणून विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. मात्र तरीदेखील त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्याच्या बहिणींना सतावत आहे.

सूरज हा ईएसआयसी म्हणजेच कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा सदस्य असल्याने त्याला आयुष्यभर सहकार्य मिळावे, यासाठी डॉक्टर्स प्रयत्नशील असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, सूरजच्या मज्जारज्जूला गंभीर मार बसल्याने त्याला छातीखाली अपंगत्व आले आहे. त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर असल्याने त्याच्या दोन्ही बहिणी चिंतेत आहेत. तर डिस्चार्ज झाल्यावर त्याची भावंडे त्याला घरी कशी सांभाळतील? असे अनेक प्रश्न सूरजच्या कुटुंबासोबत डॉक्टरांना सतावत आहेत.

Ahmednagarlive24 Office