Maharashtra News : राज्यात तलाठी भरती परीक्षेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली असताना नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांत पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत; परंतु संबंधित प्रकार परीक्षा केंद्रांच्या बाहेर घडला आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीनेही ऑनलाइन सुरक्षिततेबाबत काटेकोर नियोजन केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा नियोजित वेळेत ठरल्याप्रमाणे टप्प्यांमध्ये पार पडणार असून उमेदवारांनी निश्चिंतपणे परीक्षेला सामोरे जावे. अफवा पसरवणाऱ्यांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील तलाठी भरती परीक्षेत होणारे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे, पेपरफुटी प्रकरणामुळे जिल्हा प्रशासकीय पातळीवरून संबंधित प्रक्रिया थेट जमाबंदी आयुक्तांच्या समन्वयाने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार चार हजार ४६६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले असून राज्यभरातून तब्बल ११ लाख अर्ज प्राप्त झाले.
त्यापैकी १० लाख ३० हजार उमेदवार परीक्षेसाठी पात्र झाले असून एकाच वेळी परीक्षा घेण्याचे नियोजन, परीक्षा केंद्र आणि आसन व्यवस्था, सुरक्षितता आणि इतर नियोजनाबाबत पूर्ण तयारी करत १७ ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना भूमी अभिलेख विभागाचे अप्पर आयुक्त आनंद रायते म्हणाले,
नाशिक आणि नागपूरमध्ये तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचे समजले; परंतु संबंधित घटना परीक्षा केंद्रांवर न होता बाहेर झाल्या असून परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरात जॅमर यंत्रणा बसवण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, घड्याळ, मोबाईल, हेडफोन किंवा इतर वस्तू केंद्रावर नेण्यास उमेदवारांना मज्जाव करण्यात आला आहे.
विविध टप्यांमध्ये परीक्षा घेण्यात येत असल्याने प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वेगवेगळे आहे. उमेदवार परीक्षेला बसल्यानंतर १५ मिनिटांनी प्रश्नपत्रिका ऑनलाइन समोर येते. या प्रश्नपत्रिकेवर सांकेतिक चिन्ह, संगणक क्रमांक, काळ, वेळ तसेच परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
तलाठी भरती स्थगित करा; नव्याने परीक्षा घ्या
पुणे तलाठी भरतीसाठी दहा लाखांपेक्षा अधिक अर्ज भरले आहेत. लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात लोटण्याचा कोणताही अधिकार नाही. तलाठी भरतीचा पेपर फुटल्याने आता जाहीर असलेले तलाठी परीक्षेचे वेळापत्रक त्वरित स्थगित करण्यात यावे.
आम्ही सुचवलेल्या वरील उपाययोजना अमलात आणून परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात यावे आणि नव्याने परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने राज्य परीक्षा समन्वयक तथा भूमी अभिलेख विभागाकडे केली आहे. तसेच मागण्या मान्य करण्यात आल्या नाही तर लवकरच आपल्या कार्यालयाबाहेर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.