मंदिर बंदचा फटका .. साईबाबा पुण्यतिथी उत्सवात केवळ ३८ लाखांची देणगी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर १७ मार्चपासून दर्शनासाठी बंद असल्याने याचा आधीच मोठा फटका येथील हाॅटेल, रेस्टारंट, हार-प्रसाद दुकानांना बसला असतानाच आता साई संस्थानच्या देणगीतही कमालीची घट झाली आहे.

संस्थानच्या तिजोरीत वर्षभरातील तिन्ही उत्सवांतून दानरूपी मोठी गंगाजळी जमा होत असते. मात्र, मंदिर बंद असल्याने याचा मोठा परिणाम देणगीवर होत आहे.

नुकत्याच झालेल्या तीनदिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवात केवळ ३८ लाख १० हजार ८३२ रुपयांची देणगी प्राप्त झाली. यात ऑनलाइन पद्धतीने २८ लाख रुपये, भिक्षा झोळीत धान्य व रोख स्वरूपातील साडेतीन लाखांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी याच उत्सवात तब्बल तीन कोटी ९५ लाख १२ हजार ८४४ दान भाविकांनी दिले होते. विशेष म्हणजे दरवर्षी यात वाढ होत असते. परंतु, यंदा कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.

सर्वत्र अनलाॅक सुरू झाला असला तरी साईनगरी बहुतांशी ज्यावर अवलंबून आहेत नेमके तेच व्यवसाय अद्याप लाॅकडाऊन आहेत.

भाविक आॅनलाइन दर्शन घेऊन आॅनलाइन देणगी पाठवितात. मात्र, देणगी पेटीत जमा होणारी देणगी मंदिर बंद असल्याने अत्यल्प प्राप्त होत आहे.

संस्थानतर्फे वर्षभरात रामनवमी, गुरुपौर्णिमा, पुण्यतिथी हे प्रमुख उत्सव साजरे केले जातात.या उत्सवांत तसेच उन्हाळ्याची सुटी, अन्य शासकीय सुट्यांदरम्यान शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी होत असते.

देश-विदेशातून येणारे भाविक साईचरणी नतमस्तक होत भरभरून दान टाकत असतात. मात्र, आता भाविक येत नसल्याने याचा फटका संस्थानला बसला असल्याचे सांगण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24