अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये कोणतीही बोर्ड परीक्षा होणार नसल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. या परीक्षा ऑनलाइन होणार नाहीत.
त्यांच्या तारखाही अद्याप निश्चित नाहीत. निशंक यांनी मंगळवारी देशभरातील हजारो शिक्षकांशी ‘शिक्षण संवाद’च्या २२ व्या कार्यक्रमात सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मद्वारे चर्चा केली. ते म्हणाले की, बोर्ड परीक्षा फेब्रुवारीनंतर नक्कीच होतील.
मात्र, सरकारने अद्याप तारखा निश्चित केलेल्या नाहीत. कोरोनाची स्थिती व संबंधितांशी चर्चेनंतर तारखा ठरतील. परीक्षा ३ महिने स्थगित करण्याची मागणी पालकांनी केली होती.
तथापि, महामारीच्या काळात बोर्ड परीक्षा, जेईई आणि नीटसारख्या परीक्षा घेण्यात याव्यात, असे सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे. सीबीएसईकडून दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड परीक्षा ऑनलाइन होणार नाही.
२०२१ मध्येही पूर्वसारखीच परीक्षा घेतली जाईल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी यापूर्वी १० डिसेंबरला एक वेबिनार घेतला होता.
विद्यार्थ्यांसोबत आधी १७ डिसेंबरला लाइव्ह चर्चा होणार होती. मात्र काही कारणांमुळे ती २२ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती.