पुणे /प्रतिनिधी सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शैक्षणिक बाबतींमध्ये अनेक अडचण येत आहेत. शैक्षणिक विभाग यावर मात करण्यासाठी नियोजन आखत आहे. आता १० वी,१२ वीच्या निकालाबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे.
यंदा बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वर्तवली आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावी, बारावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.
या निकालासंदर्भातील सोशल मीडियाद्वारे उलट-सुलट माहिती नागरिकांपर्यंत पोचविली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र, शालेय शिक्षण मंत्र्यांनी निकालाबाबत खुलासा केल्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्याथी आणि पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. निकालाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने अधिकृतरित्या माहिती देण्यात येईल असेही त्या म्हणाल्या .
कोरोनाच्या महामारीमुळे दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना उत्तरपत्रिका ने-आण करताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे या शिक्षकांना प्रवासाची परवानगी द्यावी, असे स्थानिक प्रशासन, महापालिका, जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आल्याचेही गायकवाड यांनी नमूद केले.