अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार व कंटेनर यांच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना कारचालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं. शिलाटणे गावाजवल महामार्गावर ही कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेला गेली.
धक्कादायक बाब म्हणजे या कारचा वेग इतका होता की समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही कार घुसली. या अपघाताचा तडाखा इतका भीषण होता की यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला.
यात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, स्थानिक ग्रामस्थ,
पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर खाली अडकलेली गाडी व प्रवासी यांना बाहेर काढले. दरम्यान या घटनेमुळे मुंबईकडे जाणार्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.