योग्य उपचाराअभावी ‘त्या’ महिलेचा झाला मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- आरोग्य विभागाने केवळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावरच लक्ष केंद्रीत केल्याने कोरोनाव्यतीरिक्त आजाराने ग्रासलेल्या रूग्णांची हेळसांड होत आहे.

अशाच हेळसांडीमुळे, शासकिय अनास्थेमुळे तालुक्यातील जवळे येथील महिलेला आपला जीव गमवावा लागला. दि. १२ सप्टेबर रोजी जवळे येथील सुनंदा दरेकर या महिलेस श्‍वसनाचा त्रास होउ लागल्याने स्थानिक डॉक्टरांनी त्यांना पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी पाठविले.

श्‍वसनाचा अधिक त्रास होत असल्याने ग्रामिण रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना नगर येथे जाउन शासकिय रूग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला. या महिलेची तेथे कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर निगेव्टिव्ह अहवाल आला. त्यामुळे दहा दिवस तेथेच उपचार सुरू ठेवण्यात आले.

तेथील डॉक्टरांनी त्यांना काही महागडे इंजेक्शनही दिले, मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. या दरम्यान आणखी दोनदा कोरोना चाचण्या झाल्या. त्याही निगेटिव्ह आल्या. त्यामुळे या महिलेवर कोरोना व्यतिरिक्त आजाराचे उपचार होणे गरजेचे होते.

सध्या प्रशासनाने केवळ कोरोनावरच ‘फोकस’ केल्यामुळे त्या व्यतिरिक्त आजारांवर उपचार करण्यास डॉक्टरही पुढाकार घेत नसल्याचे या प्रकरणावरून उघड झाले. दहा दिवसानंतर या महिलेस खासगी रूग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला.

नगरच्या शासकिय रूग्णालयातून दरेकर यांना नगरच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. परंतू तेथे बेड उपलब्ध नसल्याने दरेकर यांना पुन्हा शासकिय रूग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचारच होत नसल्याने त्यांच्या कुटूंबातील लोक चिंतेत होते. किमान पारनेर येथे ऑक्सिजन उपलब्ध होईल.

रूग्णास पारनेर येथे घेऊन जा असा सल्ला देण्यात आला .पुन्हा दरेकर यांना घेउन त्यांचे कुटूंबिय पारनेरकडे परतले, मात्र वाटेतच सुनंदा यांचा मृत्यू झाला. दि. १२ सप्टेबरपासून सुनंदा यांच्या जिवाची अशा पद्धतीने हेळसांड सुरू होती. पारनेर ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आल्यानंतर दरेकर यांची मृत्यूपश्‍चात कोरोना चाचणी करण्यात आली.

ती चाचणीही निगेटिव्ह आली. त्यानंतरचे सोपस्कार पुर्ण करण्यातही दरेकर कुटूंबियांची बरीच ससेहोलपट झाली. अखेर सुनंदा यांचा मृतदेह ताब्यात घेउन त्यांच्यावर जवळे येथे अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटूंबियांवर आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24