‘त्या’ तरुणाचा गळफास की खून ? कोपर्डी गाव पुन्हा एकदा चर्चेत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे येथील समाधान शिंदे यांच्यावर ट्रॅक्टर चोरीचा संशय घेऊन त्याना मारहाण करण्यात आली.

त्यानंतर समाधान शिंदे याचा मृतदेह एका लिंबाच्या झाडाला फासावर लटकवलेल्या अवस्थेत आढळला होता. याप्रकरणी बाळू शिंदे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गणेश नारायण मोरे, धनंजय बबन गुंड व काका ज्ञानदेव सुद्रिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दहा नोव्हेंबरला ही घटना घडली आहे. ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून वंचित आघाडीने या प्रकरणात उडी घेतल्याने प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. कोपर्डी येथील समाधान रमेश शिंदे याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व मयताचा भाऊ यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच याप्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याऐवजी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा,

अशा आशयाचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना दिल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बारसे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे म्हणाले, ‘ कोपर्डी (ता.कर्जत) येथील समाधान रमेश शिंदे आत्महत्या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी होणे गरजेचे आहे.

मात्र, राष्ट्रवादीच्या मोठ्या पदाधिकाऱ्याचा कारखान्याचे कर्मचारी या प्रकरणात आरोपी असल्यामुळे पोलीस प्रशासन पूर्ण दबावात काम करीत आहेत. ‘ नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मयत समाधान शिंदे यांचा भाऊ बाळू शिंदे हे देखील उपस्थित होते. प्रतीक बारसे पुढे म्हणाले,

‘समाधान शिंदे हा ट्रॅक्टर चालक एका कारखान्यात ऊस वाहतुकीचे काम करीत होता. ट्रॅक्टर चोरीला गेल्याच्या कारणावरून त्याला संबंधित कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. त्यानंतर समाधान शिंदे याचा मृतदेह हा कोपर्डी येथे लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने दोन दिवसापूर्वी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर आता पुन्हा मयताचा भाऊ व आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटलो. आज देखील चर्चा झाली असून ही घटना गंभीर असून सहकार्य करू, असे पोलीस अधीक्षक म्हणाले आहेत’

‘ घटनेला दहा दिवस होऊन देखील तसेच आरोपींवर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल असताना देखील मयताच्या कुटुंबाची त्या भागातील पोलीस उपअधीक्षक यांनी भेट घेतली नाही.

आम्ही फोन केला तर कुटुबियांना ऑफीसला पाठवून द्या, असे सांगण्यात आले. याप्रकरणाची नि:पक्षपातीपणे व कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24