पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर हे भाविकांचे मोठा श्रद्धास्थान आहे. आता या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्येच तळघर आढळले आहे. तळघरामध्ये सुमारे अंशतः भग्न पावलेल्या तीन मूर्ती व पादुका सापडल्या आहेत. या मुर्त्यांमध्ये भगवान विष्णूच्या दोन, तर महिषासुर मर्दिनीची एक या मुर्त्यांचा समावेश आहे.
पुरातत्त्व विभागाच्या अंदाजानुसार, या मूर्ती सोळाव्या शतकातील आहेत. अंशतः भग्न पावलेल्या या मूर्ती तळघरात सुरक्षेसाठी ठेवल्या असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे सध्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे.
हे काम सुरू असताना मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर, सोळखांबी मंडपातून मंदिराच्या बाहेर पडताना हनुमान दरवाजाजवळ गुरुवारी (ता. ३०) मध्यरात्री फरशीचे काम सुरु होते. त्यावेळी त्यांना तेथे जमिनीखाली पोकळी असल्याचे आढळून आले.
३१ मे रोजी दुपारी पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक विलास वहाने यांच्यासह वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांच्यासमक्ष तळघराची पाहणी करण्यात आली. चार बाय सहा फूट लांबी-रुंदीच्या आणि सहा फूट खोल आकाराच्या या तळघरात तीन मूर्ती आढळून आल्या.
चुन्याच्या भुकटीमध्ये या सर्व मूर्ती व्यवस्थित ठेवल्याचे आढळून आले. विष्णूच्या दोन आणि महिषासुर मर्दिनीच्या एका मूर्तीसह सेवकाची १२ ते १५ इंच उंचीची एक मूर्ती, दगडी पादुका, पाच व दहा पैशांची नाणी, काचेच्या आणि मातीच्या बांगड्या या तळघरात सापडल्या आहेत.
या सर्व सोळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे यांनी व्यक्त केला असून बाकी संशोधनानंतर आयुर्मान काढले जाईल असेही ते म्हणाले. श्री अष्टभुजा देवीची मूर्ती पाषाणाची अत्यंत सुबक असून मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा, कमळ आहे. श्री विष्णूची मूर्ती तीन ते साडेतीन फूट उंचीची असून त्याला चार हात असून त्या हातामध्ये शंख, गदा, त्रिशूळ आहे.