भारतीय जनता पक्ष माझ्या बापाचा,तो सोडणार नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बीड :- भारतीय जनता पार्टी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कार्यालयातून बाहेर काढून घराघरात पोहोचवली. त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष केला. यामुळे हा पक्ष माझ्या बापाचा असून आपण तो सोडणार नाही, अशी भूमिका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केली.

याचबरोबर पक्षातील काही लोकांना आपण पक्षात नसावे, असे वाटत असेल तर तो निर्णय मात्र त्यांनी घ्यावा, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.

गुरुवारी (दि.१२) लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त येथील गोपीनाथ गड (पांगरी, ता. परळी) येथे आयोजित मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. प्रीतम मुंडे, पाशा पटेल, आ. मोनिका राजळे, आ. माधुरी मिसाळ, अतुल सावे, रोहिणी खडसे, सुजितसिंह ठाकूर, सुरेश धस आदी उपस्थित होते.

समर्थकांसमोर आपली भूमिका मांडताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पक्ष सोडणार या अफवा असून त्या कोणी पसरवल्या याचा शोध प्रदेशाध्यक्ष या नात्याने चंद्रकांत पाटील यांनी घ्यावा. आम्हाला पक्षाच्या बाहेर ढकलण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, हा पक्ष माझ्या वडिलांनी वाढविलेला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24