महाराष्ट्र

महाराष्ट्रातील भाविकांची बस नेपाळमध्ये बुडाली ! २७ मृत्यू, अनेक जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

महाराष्ट्रातून नेपाळमध्ये गेलेल्या भाविकांची बस शुक्रवारी महामार्गावरून घसरून १५० मीटर खाली दुथडी भरून वाहणाऱ्या मार्त्यांगडी नदीत कोसळली. या भीषण अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला असून, १६ जण जखमी आहेत.

यामध्ये जळगाव मधील भाविकांचा समावेश आहे. दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतदेह त्यांच्या गावी आणण्यासाठी राज्य सरकार नेपाळ सरकार व उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात असल्याचे सांगितले.

जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे नेपाळला जाणार असून, यासाठी त्यांना पंतप्रधान कार्यालयाने परवानगी दिली आहे.

जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव, पिंपळगाव, तळवेल या गावांमधील १०४ भाविक नेपाळमध्ये १० दिवसांच्या यात्रेसाठी गेले होते. उत्तर प्रदेशातील प्रयागराजपर्यंत रेल्वेने गेल्यानंतर तेथून गोरखपूरमधील एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या तीन बसेसद्वारे ते नेपाळला गेले.

नेपाळच्या पोखरा येथे दोन दिवस भ्रमंती केल्यानंतर या तीनही बस शुक्रवारी सकाळी काठमांडूसाठी रवाना झाल्या. या तीनपैकी एक बस (यूपी-५३-एफडी-७६२३) नेपाळच्या तनहुना जिल्ह्यातील आंबुखैरेनी परिसरात आइना पहारा महामार्गावरून १५० मीटर खाली मार्त्यांगडी नदीत कोसळली.

सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या बसमध्ये ४१ प्रवासी आणि चालक व सहाय्यक असे एकूण ४३ जण होते. हे सर्व प्रवासी वरणगावचे रहिवासी असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच नेपाळचे सशस्त्र पोलीस दल, नेपाळचे लष्कर आणि आपत्कालीन विभागाच्या जवानांनी मदत व बचाव कार्य सुरू केले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत कोसळलेल्या या बसचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे दिसते.

दोरी बांधून जखमींना आणि मृतदेहांना महामार्गापर्यंत नेण्यात आले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश सरकारने नेपाळ सीमेलगतच्या महाराजगंज जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. डोंगराळ प्रदेश असल्याने नेपाळमधील नद्यांच्या प्रवाहाचा वेग नेहमीच अधिक असतो. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

Ahmednagarlive24 Office