या कारणामुळे होतेय हृदयरुग्णांमध्ये वाढ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरीकरणामुळे जीवनशैलीत बदल झाला आहे. बसून काम करणे व आरामात जगणे वाढले आहे. मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार व व्यायामाचा अभाव यामुळे हृदयरोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा हा परिणाम आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी व्यक्त केले.

‘वयाच्या चाळीशीनंतर आरोग्य तपासणी करून योग्य त्या आरोग्य चाचण्या केल्या पाहिजेत. डॉक्टरांचा सल्लाही घेतला पाहिजे,’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले. श्रीरामपूरमध्ये रोटरी क्लब व इनरव्हील क्लब यांच्या पुढाकाराने ‘हृदयरोग कसा टाळावा’ या विषयावर डॉ. हिरेमठ यांचे व्याख्यान नुकतेच झाले.

या वेळी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एन. जी. चौधरी, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश कुंदे, उल्हास धुमाळ, विनोद पाटणी, सुनीता धुमाळ, शीतल कुंदे, उमा हिरेमठ उपस्थित होते. ‘प्रगत देशामध्ये हृदयरोगाचे प्रमाण कमी होत आहे. या तुलनेने भारतात मात्र जीवनशैलीतील बदलामुळे ते वाढत आहे.

वाढते शहरीकरणही त्याला कारणीभूत आहे,’ असे सांगून डॉ. हिरेमठ म्हणाले, ‘लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण झाली तर हृदयरोगाचे प्रमाण कमी करता येईल. नवे संशोधनही झाले असून त्यामुळे हृदयरोगावरील आधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातात; तसेच हृदयरोपणही करता येऊ शकते.

त्यासाठी अवयवदान चळवळ वाढवली पाहिजे.’ ‘मलेरिया, विषमज्वरासारखे आजार जंतु संसर्गामुळे पूर्वी होत असत. पण आता हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग हे नवीन आजार आले आहेत व ते वाढत आहेत. जीवनशैलीतील बदल त्याला कारणीभूत आहे. सिगारेट, तंबाखू, गुटखा या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.

काय खायचे आणि खायचे नाही, याचे शिक्षण लोकांना मिळाले पाहिजे. ताणतणावाचे जीवन जगू नये. राग आला तर तो व्यक्त करावा. प्राणायाम, योगसाधना, चालणे, व्यायाम नियमित करावेत. तळलेले पदार्थ व बाहेरचे पदार्थ खाऊ नये,’ असे आवाहनही त्यांनी केले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24