अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-मुंबईसारख्या रेड झोनमधून येणाऱ्या लोकांमुळे नगर तालुक्यातील वाकोडी, निंबळक या गावांत सोमवारी कोरोना रुग्ण सापडले. पत्नीला भेटायला वाकोडीला आलेली ४२ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली.
ही व्यक्ती छुप्या मार्गाने आली. गावात आल्यानंतर क्वारंटाइन न होता घरी वास्तव्यास होती. मुंबईमधून निंबळक येथे आलेली ३० वर्षीय गरोदर महिलाही बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
ती बाळंतपणासाठी आल्यावर स्वतःहून तपासणी करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेली होती, असे सांगितले जात असले, तरी गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार ती घरी आली होती.
तेथे त्रास जाणवू लागल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलवले. तिची तपासणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
पॉझिटिव्ह आलेल्या वाकोडी येथील व्यक्तीची पत्नी आणि निंबळक येथील महिलेला आणण्यासाठी गेलेला पती, महिलेचे आई-वडील, वडगाव गुप्ता येथील वाहनचालक अशा सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार अाहे.
निंबळक आणि वाकोडी येथे होम टू होम तपासणी करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीच्या आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी सांगितले.
मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे अशा रेड झोनमधील नागरिक जिल्ह्यात येऊ लागल्याने ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे.