Big Breaking : नगरसेवकाच्या भावाने बायकोची केली हत्या ! नंतर स्वतचाही झाला मृत्यू….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Big Breaking : ठाण्यातील कळवा परिसरात माजी नगरसेवकाच्या भावाने पत्नीवर गोळीबार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली.

कळव्यातील प्रसिद्ध आणि राजकीय पटलावरील साळवी कुटुंबात ही घटना घडली. या घटनेने कळवा परिसर हादरला.

शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेत माजी नगरसेवक गणेश साळवी यांचे बंधू दिलीप साळवी यांनी पत्नी प्रमिला साळवी हिच्यावर गोळीबार करून हत्या केली. हत्येनंतर दिलीप साळवी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दिलीप साळवी आणि प्रमिला साळवी दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा रुग्णालयात पाठवले असून, अहवालानंतर पोलिसांच्या तपासला दिशा मिळणार आहे.

मृत आरोपी दिलीप साळवी हे माजी नगरसेवक गणेश साळवी यांचे भाऊ आहेत. ते मनीषा नगर येथील कुंभार आळी येथील यशवंत निवास येथे आई, पती-पत्नी आणि मुलासोबत राहत होते. दिलीप साळवी आणि पत्नी प्रमिला यांच्यात कौटुंबिक वाद होते. याच वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

साळवी यांच्याकडे परवानाधारक पिस्तुल होते. वाद वाढल्याने साळवी यांनी रागाच्या भरात आपल्या जवळील पिस्तुलातून चार गोळ्या झाडून पत्नी प्रमिला हिची हत्या केली, असे बोलले जात असले तरी पोलिसांना मात्र एकच गोळी झाडल्याचा पुरावा मिळाला आहे.

पत्नीच्या हत्येनंतर साळवे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र घटनास्थळी पोहोचलेले पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि पोलीस अधिकारी यांना रक्ताच्या थारोळ्यात प्रमिला साळवी आणि दिलीप साळवी यांचे मृतदेह आढळले.

त्यामुळे दिलीप साळवी यांचा मृत्यू कशाने झाला, याबाबत शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रमिला साळवी आणि दिलीप साळवी यांच्यात कोणत्या कारणावरून वाद होता आणि दिलीप साळवी यांनी आपलीच पत्नी प्रमिला यांची हत्या का केली, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.