सातारा : वाई तालुक्यातील परखंदी येथील शिक्षक पोपट पांडुरंग जाधव (मूळ रा. दिवडी, ता. माण) यांनी शनिवारी सकाळी शाळेतच पेटवून घेतले होते, यात ते गंभीर जखमी झाल्यामुळे यांचा रविवारी मृत्यू झाला.
या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, नेमकी घटना कशी घडली? याबाबत पोलिसांनाही माहिती मिळालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार पोपट जाधव यांनी अंगावर ओतून घेवून पेटवून घेतले. शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने परिसर हादरुन गेला असून पालक वर्गामध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोपट जाधव यांना उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले.
या घटनेत ते 90 टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाले होते. ते बोलण्याच्या स्थितीतही नव्हते. उपचार सुरु असताना मात्र त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचा सुरुवातीला जबाब घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र प्रकृती गंभीर असल्याने ते शक्य झाले नाही. घटनेबाबत नेमकी माहिती देण्यासही कोणी पुढे येत नव्हते. रविवारीही अशीच परिस्थिती कायम होती. यामुळे या घटनेबाबत गूढ निर्माण झाले असून पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.