नगर तहसील कार्यालयात सरार्स होतेय पैशांची मागणी… इसळक येथील शेतकऱ्याने वेधले तहसीलदारांचे लक्ष

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- नगर तहसील कार्यालयात विविध महसुली व इतर महत्वाच्या कामानिमित्त मोठी वर्दळ असते. याठिकाणी कायमच गर्दी आढळून येते.

जुने सातबारा उतारे, फेरफार, आणि महसुलीदृष्टीने महत्वाचे दस्त भूमिअभिलेख कक्षात जतन करून ठेवलेले आहेत. याविभागाकडे अर्जदारांनी मागणी केलेले दस्त, उतारे, विहित मुदतीत उपलब्ध करून देणे ही, संबधित विभागाची जबाबदारी आहे.

भूमिअभिलेख विभागाने मात्र कायदे, नियम पद्धतशीरपणे फाट्यावर मारले आहे. खाजगी पंटरकरवी येथील कामे मार्गी लावली जात आहेत. हे पंटर काही जणांकडून तर अर्जही घेत नाहीत. वरचेवर पैसे घेऊन ही कामे निकाली काढली जातात. जे शेतकरी याविभागाला थेट अर्ज करून दस्त, उतारे मागवितात, त्यांना टाळले जाते.

उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. हे दस्त सापडत नाहीत. हे रेकॉर्ड जिथं आहे, तिथं लाकड पडली आहेत, त्याला वेळ लागतो, अशी बेजाबदारपणाची उत्तरे दिली जातात. मग उघडपणे पैशांची मागणी केली जाते. हा व्यवहार राजरोसपणे दिवसेंदिवस सुरूच आहे. वरिष्ठ अधिकारीही याप्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत.

असाच एक वाईट अनुभव इसळक (ता. नगर) येथील शेतकरी शिवाजी भाऊसाहेब चव्हाण यांना आला आहे. घडला प्रकार असा की, चव्हाण यांनी १८ सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना अर्ज दाखल केला. सदरच्या अर्जाद्वारे त्यांनी इसळक येथील गट नं. २२५ चे सन २०१२ व १३ मधील हस्तलिखित उतारे,

फेरफार क्रमांक २१३८ व संबधित क्षेत्राचे परिपत्रक आदी द्स्तांच्या साक्षांकित प्रती मागविल्या होत्या. याबाबत त्यांनी पाठपुरावा केला. खाजगी पंटर आणि संबधित कर्मचार्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे पैशांची मागणीही केली. याप्रकाराने ते संतापले. श्री. चव्हाण यांनी यागैरप्रकाराकडे थेट तहसीलदारांचे लक्ष वेधले आहे.

त्यांनी १४ ऑक्टोबरला तहसीलदारांना स्मरणपत्र पाठवले आहे. यापत्राद्वारे त्यांनी आपली व्यथा तहसीलदारांसमोर मांडली आहे. तहसीलदारही याप्रकाराकडे सोयीस्कर ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करून या भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आणि खाजगी पंटरांना पाठीशी घालणार की शेतकरी शिवाजी चव्हाण यांना न्याय देणार, याकडे लक्ष लागून आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24