मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊनचे तीन टप्पे पार पडले. परंतु तरीही समाधानकारक परिस्थिती तयार झाली नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊन ठेवण्याबाबत प्रत्येक राज्याच्या मुख्यत्र्यांना अधिकार दिले.
त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होत आहे. या चौथ्या टप्प्यात नेमकं कसं चित्र असेल याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एका मुलाखतीत राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण मुद्दे मांडले.
या टप्प्यात ग्रीन झोन पूर्णपणे सुरु राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, ऑरेंज झोनमध्येसुद्धा कंटेन्मेंट क्षेत्र वगळता इतर भाग हा सुरु केला जाऊ शकतो. राज्यात अनेक जिल्हे आणि गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत.
हे समाधानकारक बाब लक्षात घेता या भागांमध्ये बऱ्याच अंशी लॉकडाऊनला शिथिलता दिली जाऊ शकते असं ते म्हणाले. रेड झोन बाबत बोलताना टोपे म्हणाले की, अशा ठिकाणी कंटेन्मेंट झोन वगळता इतर सर्व भागांमद्ये व्यवसाय आणि उद्योग पूर्णपणे सुरु रहावेत असं नियोजन करणे गरजेचे आहे.
रेड झोनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना इतरत्र वावरण्याची मुभा मात्र मिळणार नाही असेही ते म्हणाले. लॉकडाऊनच्या या टप्प्यात ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अनेक कारभार सुरु करावे लागतील.
पण, यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा मंत्र मात्र आवर्जून पाळला गेलाच पाहिजे हाच मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा कुठेही उडवला जात असल्याचं लक्षात आल्यास त्या ठिकाणी लागू करण्यात आलेले नियम पुन्हा कठोर करण्यात येतील अशी माहिती टोपे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे सर्व अधिकार असल्याची बाब त्यांनी मांडली. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर त्यातही जर कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसला तर,
ऑरेंज आणि ग्रीन अशा झोमध्येही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यात येईल असंही ते म्हणाले. तसेच कोणी बेजबाबदार वागले तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला.