महाराष्ट्र

वर्षभरापासून प्रतीक्षा असलेले नुकसानभरपाईचे शासनाचे अनुदान अजूनही बँक खात्यात आले नाही…

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : वर्षभरापासून प्रतीक्षा असलेले नुकसानभरपाईचे शासनाचे अनुदान अजूनही बँक खात्यात जमा न झाल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत असून, किमान सणासुदीच्या तोंडावर उर्वरित शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी राहाता तालुक्यातील चितळी – जळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मागील वर्षी ऐन सोयाबीन, कापूस काढणीच्या वेळी झालेल्या गारपिट व पावसामुळे शेतातील पिकाची दाणादाण होऊन पिके भुईसपाट झाली होती. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांवर दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली.

त्याचा थेट परिणाम रब्बी हंगामातील पिकावर होत शेतीचे अर्थचक्र खोलवर रुतल्याने शेतकरी हवालदिल झाला. शासनाने तातडीने पंचनामे केले व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन असल्याच्या नारा देत नुकसानभरपाई जाहीर करून मदत करण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर मात्र टप्याटप्याने शेतकरी वर्गाच्या खात्यात रक्कम येण्याचे जमा झाली; परंतु चितळी-जळगाव येथील बहुतेक शेतकरी अजूनही या मदतीपासून आहे. रोज बँकेच्या पायऱ्या झिजवत नाकी नऊ आलेले असताना अजूनही रक्कम जमा झाली नसल्याचे सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा होत आहे.

किमान सणासुदीच्या दिवसात जाहीर केलेली रक्कम दिलासा देणारी ठरणार आहे. त्यात चालू वर्षी खरिप हंगाम पूर्ण हातातून गेल्याने ऐन पावसाळ्यात उन्हाळयाचे चटके बसण्यास सुरवात झाली. पावसाळा संपला तरी वरुण राजा आलाच नाही.

त्यामुळे शेतकरी पूर्ण हतबल झाला आहे. आता ही शासनाने जाहीर केलेली व विमा संरक्षण कंपनी जेव्हा मदत वर्ग करील तेव्हा करील पण किमान मागील वर्षीची राहिलेल्या शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची अनुदानित रक्कम बँक खाती ताबडतोब वर्ग करावी, अशी मागणी मात्र जोर धरत आहे.

रक्कम जमाच नाही..!

गेल्या वर्षी माझे दोन हेक्टर सोयाबीन होते. सलग पावसाने मोठया प्रमाणात नुकसान झाले. वेळोवेळी केवायसी संदर्भात पूर्तता केली; परंतु आजपर्यंत नुकसान भरपाई जमा झाली नाही. –मच्छिंद्र चौधरी, विजय तनपुरे, शेतकरी

मंत्री विखेंनी लक्ष घालावे..!

मागील वर्षीची नुकसानभरपाई मिळण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी पुणतांबा मंडळाला विशेष प्रयत्न करून लाभ मिळवून दिला होता. त्याच धर्तीवर उर्वरित शेतकऱ्यांसाठी अनुदान मिळण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालून अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Ahmednagarlive24 Office