अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-नगर तालुक्यातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिव्यांगासाठी असणारा शासन निर्णयानुसार ५ टक्के निधी त्यांना मिळावा म्हणून वारंवार नगर तालुक्यातील पंचायत समितीला निवेदनाद्वारे सांगण्यात आले. परंतु सदर निधी बऱ्याच ग्रामपंचायतींनी आजपर्यंत वाटप केलेले नाही.
आपण सदर ग्रामपंचायतीला सूचना केल्या असतीलही परंतु बऱ्याच ग्रामपंचायतींनी महसुलातील हक्काचा असणारा ५ टक्के निधी आजतागायत वाटप केलेले नाही. एकप्रकारे आमच्या दिव्यांग बंधू-भगिनींच्या आयुष्याची होत असलेली मस्करी म्हणावी लागेल. म्हणून आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे की,
एकतर आमच्या दिव्यांगांच्या नावावर असणारी संपूर्ण घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी. तसेच दिवाळीपूर्वी दिव्यांगांच्या हक्काचा ५ टक्के निधी देऊन त्यांची दिवाळी गोड करावी. ज्यांना घरे नाहीत त्यांच्या खाती शिल्लक असणारा ५ टक्के निधी जमा करावा,
अशा प्रकारचा पत्र व्यवहार करुन १५ दिवस झाले असून कुठल्याही प्रकारची दिव्यांगप्रती सहानुभूती दाखवण्यात येत नसल्याच्या कारणास्तव रूद्र अपंग संघटनेच्यावतीने पंचायत समिती कार्यालयासमोर जिल्ह्यातील पदाधिकारी व दिव्यांग बंधूंनी घंटानाद करण्याचा इशारा दिला होता.
परंतु पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन धाडगे यांनी सध्या कोरोनाचा काळ चालू असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे ग्रामपंचायतची वसुली गोळा झालेली नाही. यामुळे दिव्यांगांचा देण्यात येणारा निधी उपलब्ध नाही.
लवकरच दिव्यांगांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुमच्याकडून होणारे आंदोलन स्थगित करावे, असे सांगण्यात आले.
त्यानुसार होणारे घंटानाद आंदोलन आम्ही रूद्र अपंग संघटनेच्यावतीने स्थगित करत आहोत. अशी माहिती रुद्र अपंग संघटनेचे अध्यक्ष वसंत शिंदे यांनी दिली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा सचिव बापू पांडुळे, नगर तालुकाध्यक्ष रामेश्वर तुपे, जिल्हा सरचिटणीस अमोल कराळे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved