बाळ बोठेबाबत ती माहिती अफवाच निघाली, पोलिसांनाही झाला नाहक मनस्ताप!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील पसार  पत्रकार आरोपी बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला हायकोर्टाच्या आवारातच पोलिसांनी अटक केल्याच्या अफवा पसरली अन नगरसह औरंगाबादच्या माध्यम विश्वात एकच गोंधळ उडाला.

याबाबतची खातरजमा करण्यासाठी नगर पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांचा फोन, मोबाईल  सतत खणाणत होता. या प्रकारामुळे पोलिसांना चांगलाच मनस्ताप झाला.शेवटी ही केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे हा दीड महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने आज फेटाळला.

त्यामुळे बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज सुनावणी होवून खंडपीठाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे. फरार बोठेला शोधण्यासाठी स्टॅडिंग वॉरंट जारी करण्यात आले असून बोठेच्या मागावर राज्यातील सर्वच पोलिस आहेत.तरीही पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी होत आहे.

बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे पोलिसांसोर मोठे आव्हान आहे. जिल्हा न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यानंतर बोठे याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता त्यावर सुनावणी पूर्ण होऊन आज न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24