अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात वाढते अवैध धंदे हे वाढत असताना त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र पोलिसांची हि कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे.
यामुळे काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. यातच जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले होते. यातच पुन्हा एक मोठी माहिती समोर येत आहे.
शहरात २६ ऑक्टोबर रोजी पकडलेल्या बनावट डिझेल प्रकरणाचा तपास तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडून काढून घेत श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला गती न मिळाल्यानेच हा तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ढुमे यांच्याकडून मिटके यांच्याकडे दिल्याची चर्चा आहे.
तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने २६ ऑक्टोबर रोजी शहरातील जीपीओ चौक परिसरात छापा टाकून १ हजार ९३७ लिटर बनावट डिझेल जप्त केले होते.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला होता. हे प्रकरण गंभीर असतानाही गेल्या पंधरा दिवसांत या गुन्ह्यात केवळ दोघांचा अटक झालेली आहे.
पहिल्या आरोपीला तर घटनेच्या दिवशीच अटक झाली होती. त्यानंतर या प्रकारणात ढुमे यांच्या पथकाने जामखेड येथील एकास अटक केली़.
त्यानंतर तपासात विशेष काही प्रगती दिसून आली नाही. दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत ढुमे यांच्याकडून तो तपास काढून घेतला.
तसेच ढुमे यांच्या तुलनेत उपाधीक्षक संदिप मिटके यांना जिल्ह्यात कामाचा अनुभव जास्त असल्याने हा तपास त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved