Maharashtra news : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत जाहीर केल्याप्रमाणे मशिदींवरील भोंग्यांच्या संबंधी घरोघरी पोहविण्यासाठीची पत्रे तयार झाली आहेत.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत ती राज्यभर पोहचविण्यात येणार आहेत. ते पत्र अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मात्र यासंबंधी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना खुले आवाहन केले आहे.
कार्यकर्त्यांना उद्देशून ठाकरे यांनी म्हटले आहे,
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे.
त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.
तुम्ही एकच करायचं आहे – माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही, असेही ठाकरे यांनी बजावले आहे.