कोरोना काळानंतर जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- जी मंडळी कोरोनाच्या संकट काळात बिळात जाऊन लपून बसली, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर विकासाला चालना देण्याऐवजी अशा लोकांनी आता आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी औरंगाबाद, अहमदनगर शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जातीचा व पैशाचा वापर करून ही मंडळी सत्तेमध्ये आली. तर लोककल्याण, विकास व विवेकापासून दूर असून, ही मंडळी तमास चेतनेच्या गर्तेत सापडली आहे.

गरिबांचे आश्रू पुसण्याऐवजी ही मंडळी तमसचेतनाधारी वृत्तीने समाजातील गरीबी, अशिक्षितपणाचा फायदा घेऊन सत्ता राबवू पाहत असल्याचे स्पष्ट करुन,

शहर नामांतराची मागणी करणार्‍यांचा संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. इंग्रजांनी भारतात ज्या पद्धतीने तोडा-फोडा आणि राज्य करा.

या सूत्राचा अवलंब करुन ही मंडळी सत्ता उपभोगण्यासाठी दोन समाजात दुही पसरवण्याचे काम करत आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या हक्कापासून व विकासापासून वंचित ठेऊन

धार्मिक व जातीयवादाला खतपाणी घालणारा मुद्दा उपस्थित करणे हे एकप्रकारे जनतेचे शोषण आहे. कोरोनाचे संकट संपत असताना जलद गतीने बेरोजगारांना रोजगार देणे, उद्योग-व्यवसायाला चालना देणे,

आर्थिक संकटात सापडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी लोकप्रतिनिधी व काही मंडळी समाजात आग लावण्याचे धंदे करीत असल्याचा आरोप अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केला आहे.

शहरांचा इतिहास माहीत नसणार्‍यांच्या कामाचे ऑडीट होणे गरजेचे आहे. जे व्यक्ती शहर नामांतराचा मुद्दा पुढे करत आहे. त्यांचे शहरासाठी व विकासाकरिता योगदान काय? हे देखील तपासण्याची गरज आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरांच्या नामांतरास केलेला विरोधा जनतेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. चुकीच्या गोष्टींना सर्वसामान्य जनतेने विरोध करुन चांगल्या विचारांना समर्थन देण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24