मराठा आंदोलनाबाबत तालुक्यातील नेतेमंडळी गप्प; समाजात नाराजी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन पेटलेले असताना पारनेर तालुक्यातील नेते मंडळी गप्प असल्याने मतांसाठी ही लाचारी का, असा संतापजनक प्रश्न पारनेर तालुक्यातील मराठा समाज करत आहे.

मागील पंधरा दिवसांपासून जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणाला बसले होते, काही दिवसांपूर्वी या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.

महाराष्ट्रात या लाठीचार्जचे तीव्र पडसाद उमटले, अनेक ठिकाणी जाळपोळ झाली तर काही ठिकाणी युवकांनी आत्महत्या केल्या, अनेक ठिकाणी याबाबत पुढाऱ्यांना जाब विचारण्यात आला. जालन्याच्या घटनेने एक प्रकारे महाराष्ट्र पेटला. अनेक ठिकाणी आमदारांना मराठा समाजाने आडवून जाब विचारत निषेध केला.

संपूर्ण महाराष्ट्रात मराठा अंदोलनाने पेटलेला असताना पारनेर तालुक्यात मात्र याबाबत शांतता जाणवत आहे, तालुक्यातील नेते मंडळी ना याबाबत काही बोलताना दिसत आहेत ना काही शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत,

सर्वच पक्षांचे नेते मंडळी विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजने करत असल्याचे दिसत आहे. याबाबत तालुक्यातील युवकांनी नागरिकांनी सोशलमीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील पुढाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

पारनेर तालुक्यातील बहुतांश उच्चपदांवर मराठा समाजातील नेते मंडळी असतानाही आपल्याला ज्या समाजाने मोठे केले, वेळोवेळी मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले, संकटकाळी आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेल्या मराठा समाजाला आज याच नेत्यांच्या सहकार्याची आवश्यकता असतानाही ही नेतेमंडळी मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ना रस्तावर उतरले अथवा कुठे आवाज उठवताना दिसत नाही.

याबाबत काही युवकांनी सांगितले की, तालुक्यातील नेते नेहमीच मराठा समाजाचा वापर करत आले आहेत. निवडणुका आल्यावर यांना मराठाबांधव दिसतात, मग नातेसंबंध शोधत येतात. निवडणुका झाल्यावर व मतलब संपल्यावर समाजबांधवाना सोयीस्कर विसरून जातात.

मुळात मराठा समाजातीलच काही नेत्यांनाच वाटते, समाज सुधारला नाही पाहिजे, जेणेकरून हे असेच आपल्या बरोबर फरपटत राहिले पाहिजे. यांचा हवा तसा, हवा तेव्हा वापर करून घेता आला पाहिजे. इतर समाज नाराज होईल, या भीतीपोटी तालुक्यातील मराठा नेते आरक्षणाबाबत मूग गिळून असून, याबाबत सोशलमीडियाच्या माध्यमातून युवक राग व्यक्त करताना दिसत आहेत.