Maharashtra News : राज्यात महाविकास आघाडीचे दळभद्री सरकार जाऊन ट्रिपल इंजिनचे गतिमान सरकार आले आहे. सत्ता असताना राहुरीमध्ये विकासकामे झाली नाहीत. आता राहुरीची सत्ता त्यांना पुन्हा मिळणार नाही, असा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
राहुरी येथे राहुरी नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरउत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर झालेल्या १३४ कोटी ९८ लाखांपैकी ९२ कोटी ९८ लाख रुपयांच्या सुरू होणाऱ्या भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्याचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्याने देशाने चांद्रयान- ३ चे यशस्वी पाऊल पडले आहे. एक रुपयात पीक विमा योजनेमुळे राहुरीत ५४ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला.
अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलासा दिला आहे. राहुरी तालुक्यात आता परिस्थिती बदलली आहे. आघाडी, मंडळ नाही तर भाजपा म्हणूनच निधी मंजूर करण्यात येईल. कारण पक्षसुद्धा महत्वाचा आहे, असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.
खा.डॉ. विखे पाटील म्हणाले की, राहुरीचा दुर्दैवाने विकास झाला नाही. त्यामुळे आम्ही राहुरी नवीन गावठाण हद्दीतील सुमारे ११ हेक्टर क्षेत्र राहुरी पालिकेच्या नावे करत असून त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती आदी प्रशासकीय कार्यालय इमारत सुमारे १० कोटी रुपये खर्च करून बांधणार आहोत. ज्या नागरिकांना रहिवास करण्यासाठी जागा नाही अशा काही कुटुंबाला ५ एकर क्षेत्र देणार आहोत, असे ते म्हणाले.
कर्डिले म्हणाले की, निवडणुकीपूर्वी आम्ही मंजूर केलेल्या कामांचे त्यांनी श्रेय घेतले. सत्ता येईल जाईल; पण हिंदुत्व टिकले पाहिजे. आगामी निवडणुका भाजपा पक्ष चिन्हावर लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष पाटील म्हणाले की, राहुरी तालुक्यात विखेंनी एखाद्या कार्यक्रमाचे उदघाटन केले की ते लगेच दुसरे उदघाटन करतात, या कामाचेदेखील दुसरे उदघाटन होईल, असे वाटते, अशी टीका त्यांनी केली.