अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरदिवशी बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यातच काल जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील एका चिमुरड्याला बिबट्याने आईच्या कुशीतून उचलून नेले. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरे लावले होते.
मात्र एक भलतीच गोष्ट घडल्याचे उघडकीस आले आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यातून मोशन कॅमेरे आणि बोकड चोरीची घटना घडली आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव भागात वन विभागाची पथके कार्यरत झाली असून ड्रोनद्वारेही शोध सुरू आहे. पिंजऱ्यात येत नसल्याने डार्ट मारून त्याला पकडण्याचीही तयारी करण्यात आली आहे.
मात्र, विस्तीर्ण डोंगर दऱ्या, जंगल, शेतातील पिके यामुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.
लहान मुलांवर हल्ला करून त्यांना ठार मारण्याच्या घटना लागोपाठ घडल्या आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ भयभीत झाले आहे. वनविभागाने तातडीने चंद्रपूर जिल्ह्यातून पथके बोलावली.
ज्या भागात बिबट्याचा वावर आढळून आला, तेथे सुमारे पिंजरे लावण्यात आले आहेत. अद्याप तो पिंजऱ्याकडे फिरकला नाही. अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे टाळण्यात येऊ लागले आहे.
शेतीवर जाणाऱ्यांची, व्यावसायिकांची मात्र अडचण होत आहे. वन विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरण्याचेही प्रकार होत आहेत. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन राज्यमंत्री तनपुरे यांनी या भागाला भेट दिली.
त्यांनी ग्रामस्थांना संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच वन विभागाला दहा दिवसांची मुदत देत या काळात बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी सूचनाही केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved