Black Magic : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी गेलेला मांत्रिक परत घरी आलाच नाही ! नक्की काय झालं ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Black Magic : जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी एका मांत्रिकाच्या जिवावर बेतली. पैशांचा पाऊस न पाडताच पूजा मधेच बंद करीत मांत्रिकाने दारूच्या नशेत शिवीगाळ सुरू केल्याने नागपूरच्या पाच जणांनी त्याच्यावर फावड्याच्या दांड्याने हल्ला चढविला. त्यात मांत्रिकाचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना सोमवार, १४ ऑगस्ट रोजी रात्री चांदूर रेल्वे ठाण्याच्या हद्दीतील शिवणी शिवारातील एका झोपडीत घडली. घटनेनंतर काही तासांतच स्थानिक गुन्हे शाखा व चांदूर रेल्वे पोलिसांच्या संयुक्त पथकाने या गुन्ह्याचा उलगडा करीत आरोपींना अटक केली.

रमेश वामनराव मेश्राम (६३) रा. मिलिंदनगर, चांदूर रेल्वे असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात कमलाकर उर्फ कमलेश बाबुराव मेश्राम (४५), कमलाकर साहेबराव चरपे (४४), मयूर प्रमोद मडगीलवार (२६), राजेश अभिमन्यू एसनपुरे (२९) व अकरम शहा याकूब शहा (२३) सर्व रा. बिडीपेठ, नागपूर यांना अटक करण्यात आली आहे.

१४ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास रमेश मेश्राम यांना मोबाइलवर कॉल आला. कॉल आल्यावर ते लगेच एक काळी बॅग घेऊन घराबाहेर पडले. परंतु, १५ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा उज्ज्वल (२६) हा शेतात पाहायला गेला. त्यावेळी त्याला वडील रमेश हे शेतातील टीनाच्या खोलीत डोक्याला गंभीर मार लागलेल्या अवस्थेत दिसून आले.

त्याने तातडीने आपल्या मित्राच्या मदतीने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रमेश यांना मृत घोषित केले. या प्रकरणी आपल्या वडिलांची शस्त्राने वार करून हत्या केल्याची तक्रार उज्ज्वलने चांदूर रेल्वे ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून चांदूर रेल्वे पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

घटनास्थळाच्या पाहणीत तेथे मांडण्यात आलेल्या पूजेवरून सदरची घटना जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्यासारख्या अंधश्रद्धेतून घडल्याचा संशय पथकाला आला. त्या दृष्टीने पथकाने तपासचक्रे फिरविली. सर्वप्रथम रमेश मेश्राम यांच्या संपर्कात असलेल्यांबाबत माहिती गोळा करण्यात आली.

तपासात गेल्या काही दिवसांपासून कमलावर उर्फ कमलेश मेश्राम हा रमेश मेश्राम यांच्या संपर्कात असून तो अनेकदा त्यांच्या झोपडीवर आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला आणि या गुन्ह्याचा उलगडा झाला.