Maharashtra News : मराठा समाजाला आरक्षण देण्यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्यासह ग्रामस्थही उपोषणाला बसलेले आहेत.
जरांगे यांनी उपचार घेण्यास होकारही दर्शवला होता, परंतु अचानक धरपकड सुरू झाल्याने जमाव आक्रमक झाला. दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, यात पोलीस कर्मचाऱ्यांसह आंदोलकही मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत.
दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण लागले असून सोलापूर-धुळे महामार्ग ठप्प झाला. वडीगोद्री येथे महामार्गावर राज्य महामंडळ आणि कर्नाटक महामंडळाची एक अशा ११ बसेस जमावाने पेटवून दिल्या. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गनमधून हवेत गोळीबार केला.
दरम्यान, शनिवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी गोदाकाठावरील १२३ गावांतील मराठा समाज बांधवांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जनआक्रोश आंदोलन केले होते. या आंदोलनात सरकारने कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी त्याच दिवशी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्यासंदर्भात चर्चाही केली, परंतु ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यावेळीदेखील जरांगे यांनी शासकीय अध्यादेश काढण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली.
परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने त्यांनी उपोषण सुरूच ठेवले. शुक्रवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी गावात अचानक मोठा फौजफाटा दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये शंकेची पाल चुकचुकली. काही कारवाई होईल असे वाटल्याने गावात तणावाचे वातावरण तयार झाले.
दुपारी उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांना उपचार घेण्याची विनंती केली, परंतु आपली तब्येत चांगली असून उपचाराची गरज नसल्याचे ते म्हणाले, परंतु उपोषणामुळे प्रकृती बिघडेल म्हणून उपचार घेण्याबाबत प्रशासन आग्रही होते, त्यांच्याशी चर्चा सुरू असताना जरांगे यांनी शासकीय उपचार घेण्यास नकार देत खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याची तयारी दर्शवली.
त्याचदरम्यान पळापळ सुरू झाल्याने अगोदरच सज्ज असलेल्या पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. जमाव बिथरल्याचे पाहून अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवले खरे, परंतु आंदोलनाचे लोण इतरत्र पसरल्याने जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.