अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नाशिक : तालुक्यातील रोकडपाडा येथे माती खणत असताना अंगावर मातीचा ढिगारा पडून तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रोकडपाडा शिवारात चार ते पाच जण माती आणण्यासाठी गेले होते. खड्ड्यातून माती खणून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये टाकली जात होती.
माती काढण्याचे काम सुरू असतानाच दिनेश फुलाजी खांडवी (वय २५), मनोहर फुलाजी खांडवी (वय १७) व गोविंद गुलाब खांडवी या तिघांच्या अंगावर वरच्या बाजूने माती मुरुमाचे ढेपाड कोसळले.
यामुळे तिघेही ढिगाऱ्याखाली दबल्या गेले, तर एक जण माती टाकण्यासाठी ट्रॉलीकडे गेल्याने थोडक्यात बचावला. आरडाओरड होताच ग्रामस्थ धावून आले.
त्यांनी मदतकार्य सुरू करून तिघांनाही बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दिनेश व मनोहर खांडवी या दाने भावांना मृत घोषित केले, तर गंभीर जखमी गोविंद यास रुग्णवाहिकेतून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेत दिंडोरीजवळ त्याचा मृत्यू झाला.