देशात लोकशाही आणण्यासाठी राजकीय, सामाजिक परिवर्तनाची गरज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  सत्ताधारी हुकुमशाही पध्दतीने कारभार करीत आहे. शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबवून लोकशाही पायदळी तुडवत आहे. राज्यकारभार घटनेला अनुसरुन चालताना दिसत नाही.याचा सर्वसामान्यांनी गाभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

दलित व अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार होताना दिसत असून, देशात लोकशाही आणण्यासाठी व आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी एकजुटीने राजकीय, सामाजिक परिवर्तनाची मशाल प्रज्वलीत करावी लागणार असल्याची भावना अकोले जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक रुपेश बोंडे यांनी व्यक्त केली.

कोर्ट गल्ली येथील भारतीय देशभक्त पार्टीच्या संपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोंडे बोलत होते. देशभक्त पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजी डमाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकी प्रसंगी यावेळी माजी सैनिक बाबुराव औटी, तुषार औटी, अरुण खिची, प्रा. मोहन गवई आदि उपस्थित होते.

पुढे बोंडे म्हणाले की, बहुजन समाज व युवकांनी जागृक होण्याची वेळ आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र त्याची फळे फक्त प्रस्थापितांनीच घेतली. आजही सर्वसामान्य वंचितांसारखे जीवन जगत आहे. प्रस्थापितांची लोकशाही विरोधी व्यवस्था उलथून लावण्याची गरज आहे.

भांडवलदारांच्या इशार्‍यावर देश चालत आहे. 10 लाख कोटीचे भांडवलदारांचे कर्ज माफ केले जाते. मात्र टाळेबंदी काळातील सर्वसामान्यांचे फक्त व्याज माफ होत नाही. देशात गरिबी व बेकारी प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. तर शेतकरी, कामगार, आरोग्य सेवेच्या प्रशनांनी गंभीर रुप धारण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅड.शिवाजी डमाळे म्हणाले की, भारतीय देशभक्त पार्टी नेताजी सुभाषचंद्र भोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या विचारधारेने कार्य करीत आहे. संघटनेत 50 टक्के माजी सैनिक तर 50 टक्के विविध क्षेत्रातील सुशिक्षित नागरिक आहेत. प्रस्थापितांना हटवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कार्यरत आहे.

प्रस्थापितांमुळे लोकांचे राज्य राहिलेले नाही. लोकप्रतिनिधी चुकीच्या मार्गाने निवडून येऊन स्वत:चे हित साधत आहे. राजकीय क्रांती घडविण्याच्या उद्देशाने संघटना प्रयत्नशील आहे. संघटनेला संपुर्ण देशातून समविचारी देशभक्त जोडले जात आहे.

राजकीय अराजकता संपविण्यासाठी संघटनेचा पुढाकार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पारनेर तालुक्यातील मनोज औटी या माजी सैनिकांची गाव गुंडानी केलेली हत्या व हाथरस येथील दलित तरुणीवर झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24