महाराष्ट्र

मराठा समाजातील गरजूंना आरक्षणाचा फायदा मिळायलाच हवा : आ.सत्यजित तांबे

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे. मराठा समाजातील गरजूंना आरक्षणाचा फायदा मिळायलाच हवा, असे प्रतिपादन ” नाशिक शिक्षक मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी कोल्हार- भागवतीपूर येथील सकल मराठा समाजाच्या उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या भेटीदरम्यान केले.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हार भगवतीपूर येथील भगवतीमाता मंदिराच्या प्रांगणात गुरुवार पासून जितेंद्र खर्डे यांच्यासह दहा जण आमरण उपोषणास बसलेले आहेत. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आ. सत्यजित तांबे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत विचारपूस केली.

आ.तांबे म्हणाले की शासनाने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये. न्यायालयीन प्रक्रियेत अडकणार नाही असे आरक्षण लवकरात लवकर सरकारने द्यावे आणि सकल मराठा समाजास न्याय द्यावा. यावेळी कोल्हारमधील आश्रफी सोशल फाउंडेशनच्या मस्लिम बांधवांनी उपोषणस्थळी जात पाठिंबा दर्शविला. भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनीही येथे भेट देऊन पाठिंबा दिला.

उपोषणकर्ते यांची तब्येत खालावू नये यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांची तपासणी करीत आहेत. तसेच उपोषणस्थळी लोणी पोलिसांच्या विनंतीवरून कोल्हार भगवतीपर देवालय टस्ट येथे सीसीटीव्ही कॅमेरा तैनात केला आहे.

उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम असून काल शुक्रवारी दुसऱ्या दिवशी अनेकांची प्रकृती खालावल्याचे निदर्शनास आले. येथे सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे व पोलीस नाईक दिनकर चव्हाण बंदोबस्त ठेवत आहेत

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office