अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- ‘हनी ट्रॅप’ करत लुबाडणुकीचे प्रकार नवे राहिलेले नाहीत; परंतु आता ‘हनी ट्रॅप’चे पुढचे ‘व्हर्जन’ आले असून, त्यात व्हॉट्सॲप कॉल करून अनोळखी महिला पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात.
त्यानंतर त्या चक्क विवस्त्र होऊन कॉल करतात व समोरच्यालाही विवस्त्र होण्यास भाग पाडतात. विवस्त्रावस्थेतील या संभाषणाचा व्हिडीओ बनवून नंतर ‘ब्लॅकमेल’ करून लाखोंची खंडणी उकळली जाते.
राज्यात काही दिवसांपासून अशा ‘न्यूड व्हिडीओ कॉल’ला अनेकजण बळी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘हनी ट्रॅप’च्या प्रकरणात आतापर्यंत प्रेमाचे आमिष दाखवून नंतर समोरासमोर बोलावून व्हिडीओ, फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचे निदर्शनास आले आहे.
मात्र, आता ऑनलाईन फसवणुकीसाठी अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल करून ब्लॅकमेल करण्याचा हा नवा प्रकार राज्यात फोफावत आहे. व्हिडीओ कॉल करणारी महिला सुरुवातीला गोड बोलते.
तिच्या गोडगुलाबी बोलण्याला समोरचा व्यक्ती भाळला की ‘सावज’ टप्प्यात आणण्यासाठी ती त्याच्याशी सलगी वाढवते व पुढे न्यूड व्हिडीओ कॉलची क्लृप्ती वापरते.
यात महिला स्वत: विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करते व समोरच्यालाही नग्न व्हायला सांगते. त्यानंतर ऑडिओ कॉल करून संबंधिताकडे पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात येते.