Maharashtra News : देशात मासे खाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वाढत्या उत्पन्नामुळे, बदलत्या आहारामुळे आणि माशांची चांगली उपलब्धता यामुळे मासे खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २००५ ते २०२१ या कालावधीत देशात मासे खाणाऱ्यांचे प्रमाण ८१ टक्क्यांनी वाढले असून, उत्पादन दुपटीने वाढले आहे.
भारताचा २००५ मध्ये असलेला ४.९ किलो वार्षिक दरडोई मासळीचा वापर २०२१ मध्ये ८.८९ किलोपर्यंत वाढला. तर मासे खाणाऱ्या लोकसंख्येमध्ये, दरडोई वार्षिक मासळी वापर ४.९ किलोने (जवळपास ६६ किलो) वाढून ७. ४३ किलोवरून १२.३३ किलोवर गेला आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि इतर सरकारी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने फिश इंडियाने केलेल्या संशोधनामध्ये हा गेल्या १५ वर्षांतील कल दिसून आला आहे. हा कल समजावून घेण्यासाठी संशोधकांनी २००५-०६ आणि २०१९-२०२१ दरम्यान राष्ट्रीय कुटुंब घरगुती सर्वेक्षणातील माहितीचे विश्लेषण केले.
वर्ल्ड फिशने केलेल्या या अभ्यासाची कालमर्यादा २००५-२००६ ते २०१९-२०२१ अशी होती. या अभ्यासामध्ये २००५ ते २०२१ या कालावधीत देशाचे मत्स्य उत्पादन दुपटीने वाढून ५.६३ टक्क्यांच्या संकलित वार्षिक वाढीच्या दराने १४.१६४ दशलक्ष टन झाले आहे.
एकूण मासळी उत्पादनापैकी २००५-०६ मध्ये मासळीचा देशांतर्गत वापर ८२.३६ टक्के, २०१५-२०१६ मध्ये ८६.२ टक्के आणि २०१९-२०२० मध्ये ८३.६५ टक्के बाकीचा वापर अ-खाद्य कारणांसाठी आणि निर्यातीसाठी केला जात असे.
जागतिक बँकेच्या कमी-मध्यम उत्पन्न देशांच्या गटाला टाकले मागे
भारताने जागतिक बँकेच्या कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या गटाला मागे टाकले आहे, या गटाच्या सरासरी ४५ टक्क्यांच्या तुलनेत दरडोई मासळीच्या वापरात ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे; परंतु २०२० मध्ये भारताचा वापर या देशांच्या गटाच्या सरासरी १४.९४ किलोपेक्षा कमी राहिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे वाढते उत्पन्न, आरोग्याच्या फायद्यांबद्दल वाढलेली जागरूकता आणि शहरी विस्तार यामुळे माशांचा वापर वेगाने वाढत असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.
त्रिपुरामध्ये मासे खाणारे सर्वाधिक
अहवालानुसार विविध राज्यांमध्ये त्रिपुरामध्ये मासळी ग्राहकांचे सर्वाधिक ९९.३५ टक्के) प्रमाण होते. हरयाणामध्ये सर्वात कमी (२०.५५ टक्के) होते. पूर्व आणि ईशान्येकडील राज्ये, तामिळनाडू, केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये सर्वाधिक खाणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त होते.
पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या उत्तरेकडील राज्यांमध्ये सर्वात कमी होते. केरळ आणि गोवा यामध्ये दैनंदिन मासळी ग्राहकांची सर्वाधिक टक्केवारी होती, तर आसाम आणि त्रिपुरामध्ये साप्ताहिक ग्राहकांची सर्वाधिक टक्केवारी होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये मासे खाणाऱ्यांच्या प्रमाणात सर्वाधिक २०.९ टक्के वाढ झाली आहे.
मत्स्य उत्पादनांच्या आयातीत लक्षणीय वाढ
देशात वापरासाठी आयात केलेल्या मासे आणि मत्स्य उत्पादनांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. संकलित १२.८४ टक्के वार्षिक वाढीने २००५-२००६ मध्ये सुमारे १४ हजार टनवरून २०१९-२०२० मध्ये ७६ हजार टन याप्रमाणे या कालमर्यादेत जवळपास ५४३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अभ्यासात म्हटले आहे.
स्थानिक पातळीवर मिळणारे आणि आयात केलेले मासळी या दोन्हींचा विचार करता, देशांतर्गत बाजारपेठेत वापरल्या जाणाऱ्या माशांचे एकूण प्रमाण ५.४२८ दशलक्ष टनांवरून १२० टक्क्यांनी वाढून ते ११.९२४ दशलक्ष ताणावर गेले आहे.
महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त
पुरुष आणि महिला दोघांमध्ये मासळीचा वापर वाढला आहे. पण महिलांच्या (६५ टक्के) तुलनेत पुरुषांचे (७८.६ टक्के) प्रमाण जास्त होते. साप्ताहिक मासे खाण्याचे प्रमाण शहरी भागात (४२.७ टक्के) ग्रामीण भागाच्या तुलनेत (३९.८ टक्के) जास्त होते. असे अहवालात म्हटले आहे.