धनुष्यबाण जाण्याची शक्यता, ठाकरेंची नव्या चिन्हाची तयारी

Maharashtra news:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली. धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना नव्या चिन्हाबाबतही सावध केले आहे.

दुर्दैवाने धनुष्यबाण हे चिन्ह गेलेच तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता जे काही नवे निवडणूक चिन्ह घेण्याची वेळ येईल ते स्वीकारून लवकरात लवकर ते सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल याची आधीपासूनच तयारी करा, अशा सूचना ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली. या कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे गट येत्या काही दिवसांत प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे.

त्यात त्यांना यश मिळू नये यासाठी शिवसेना त्यांच्या परीने जोरदार प्रयत्न करीत आहे. मुंबई तसेच दिल्लीतील कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ यांच्याशी सातत्याने संपर्क साधत कायदेशीर डावपेचांची लढाई लढत आहे. मात्र दुर्दैवाने यात अपयश आले तरीही खचून जाऊ नये असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.