मुंबई येथे दि.१ जुलै रोजी दूध दरासंदर्भात व शासकीय अनुदान देताना येणाऱ्या जाचक अटींसंदर्भात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी दुधाला ३० रुपये दर व ५ रुपयेप्रमाणे अनुदान असा एकूण ३५ रुपये दूध दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे.
काल सोमवारी विधानभवनात बैठक सुरू होण्यापूर्वी कर्डिले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांच्या समोर दूध दरासंदर्भात व अनुदान देतानाच्या जाचक अटी रद्द करण्यासंदर्भात दूध उत्पादकांच्या वतीने मागणी केली. दोन दिवसांपूर्वी नगर येथे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी व प्लॅनचालक यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याशी चर्चा करून आपली कैफियत मांडली होती.
त्यावेळी एक दूध उत्पादक या नात्याने आपल्या सर्वांच्या भावना व अडचणी शासनासमोर मांडून सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जाचक अटी रद्द करून अनुदानासंदर्भात शेतकरी हिताचा निर्णय घेण्याबाबत सूचना केल्या.
यानंतर झालेल्या बैठकीत राज्यातील पावडर प्लांट संचालक, दूध संकलन केंद्र चालक व काही दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सर्वांच्या सूचनेनुसार व कर्डिले यांच्या आग्रही मागणीनुसार पावडर प्लांट संचालकांनी उत्पादक शेतकऱ्यांना ३० रुपये भाव द्यावा व शासन लिटर मागे ५ रुपये अनुदान असा एकुण ३५ रू लीटर भाव शेतकऱ्यांना मिळेल, असा निर्णय घेण्यात आला.
तसेच अनुदानासंदर्भात येणाऱ्या जाचक अटी शर्ती शिथिल करून सुलभरीत्या अनुदान मिळेल, असे मान्य करण्यात आले. मागील ५५ कोटी देय अनुदान देण्यासाठी १५ जुलैपर्यंत पोर्टल पुन्हा चालू केले आहे
. अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांनी पोर्टलवर माहिती भरावी, असे आवाहन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. या बैठकीस दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले,
आ. मोनिकाताई राजळे, विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, सदाभाऊ खोत, प्रीतम शहा, प्रकाश कुतवळ, दीपक लांडगे, पुरुषोत्तम आठरे यांच्यासह राज्यातील दूध संकलन केंद्र चालक पावडर प्लांटचालक उपस्थित होते.