राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. दरम्यान, पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत असून, त्याची तीव्रता आता कमी झाली आहे. त्याचाच परिणाम पावसावर झाल्याचा दिसून येत आहे.
गुरुवारी (दि.८) मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. कोकणातही पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबई, सांताक्रुझ, रत्नागिरी, डहाणू येथे तुरळक पावसाने हजेरी लावली.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तर विदर्भातील बुलढाणा, ब्रह्मपुरी आणि गोंदिया येथे हलक्या पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस कोकण, रायगड आणि पुणे अमरावती, यवतमाळ, वर्धा, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
राज्याच्या इतर भागांत पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. राज्यात सर्वांत जास्त तापमानाची नोंद मुंबई येथे ३२ अंश सेल्सिअस तर सर्वांत कमी तापमान महाबळेश्वर येथे १७.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.