Maharashtra News : तिकिटांची पुनर्विक्री, अनियमित आकारणी आदी गैरप्रकारांमध्ये अडकलेल्या वाहकांची विभागांतर्गत आगारात बदली करण्याचे परिपत्रक मागे घेण्याचे स्पष्ट निर्देश एसटी प्रशासनाने दिले असून,
याबाबतचा नवीन निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
एसटी वाहकांकडून तिकीट आकारणीमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांमुळे एसटी महामंडळाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडतो. या प्रकारांना चाप बसावा, यासाठी वाहकांना अंतर्भूत रकमेच्या १०० ते ३०० पट दंड वसूल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता.
त्याची ६ ऑगस्ट २०१६ पासून अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होऊ लागला होता. तेव्हा अशा प्रकरणांतील कामगारांची विभागांतर्गत आगारात बदली करण्याच्या सूचना देणारे परिपत्रक काढण्यात आले.
या विरोधात कर्मचारी संघटनेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावत प्रशासनाच्या एकाच गुन्ह्याला दोन शिक्षा देण्याच्या धोरणाला आक्षेप नोंदवला. न्यायालयानेही त्यावर संघटनेच्या बाजूने मत नोंदवले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एसटी कर्मचारी संघटनेशी ४ एप्रिल रोजी या परिपत्रकाबाबत सकारात्मक चर्चा करून गैरप्रकारात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली करण्याचे परिपत्रक मागे घेण्यावर शिक्कामोर्तब केले.
त्यानुसार या गैरप्रकारातून कार्यमुक्त झालेल्या, तसेच बदलीच्या ठिकाणी हजर न झालेल्यांना पुन्हा मूळच्या ठिकाणी हजर करून घेण्यात यावे, तसेच जे बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी विनंती अर्ज दिल्यास त्यांनाही अशी पुन्हा नियुक्ती देण्यात यावी, आदी संघटनेच्या मागणीला एसटी प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे.
■वाहकांच्या आर्थिक गैरप्रकारांमध्ये तिकिटांची पुनर्विक्री करणे, कमी दराची तिकिटे देणे, अनियमित तिकिटे देणे, प्रवास भाडे वसूल करून तिकीट देणे, प्रवास भाडे वसूल न करणे व तिकीट न देणे आदींचा समावेश आहे. या प्रकरणी बदल्या थांबाव्यात, यासाठी वेळोवळी आम्ही एसटी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत.
अखेर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तिकिटांमध्ये आर्थिक गैरप्रकार केल्याप्रकरणात जानेवारी २०२४ पासून ८ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या रद्द करतानाच बदल्यांबाबत सुधारित परिपत्रकीय सूचना प्रसारित करण्याचेही प्रशासनाने बैठकीत मान्य केले आहे. संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार