महसूलमंत्री म्हणाले.. महाराजांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-  सध्या राज्यात नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विकासात्मक गोष्टींना फाटा देत, आर्थिक उन्नतीच्या गोष्टींवर चर्चा न करता शहरांच्या नामांतराच्या चर्चा हल्ली जोर धरू लागल्या आहेत.

यातच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. थोरात म्हणाले कि, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे.

त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये. आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असं आवाहन देखील बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला केलं आहे.

दरम्यान, आता काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेवर शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद टोकाला गेला आहे. मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आली.

यामध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजी नगर करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये.

सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगतिलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24