अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय केंद्राने राज्य सरकारवर सोडला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात शाळा सुरु करण्याबाबत सरकराने नियोजन केले आहे.
त्यानुसार राज्याच्या दुर्गम भागात जिथे आॅनलाईनची कनेक्टिव्हिटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भावदेखील नाही तिथे जूनपासून शाळा सुरू होतील.
याशिवाय आरोग्याची काळजी घेऊन शक्य तिथे शाळा सुरू करण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी निर्देश दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, जूनपासून शिक्षण सुरू करावे.
शाळाच सुरू कराव्यात, असे नाही. आॅनलाईन, आॅफलाईन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे, त्याप्रमाणे शिक्षण सुरू करावे. मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही.
ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या, त्यांचे निर्जंतुकीकरण शासन स्वत:च्या खर्चाने करून देईल. जेथे शाळा सुरू करणे अडचणीचे आहे, त्याठिकाणी इतर पर्याय तसेच आॅनलाईन शिक्षण सुरू करावे.
गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र, स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून आॅनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही ते म्हणाले.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार कपिल पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत डॉ. रघुनाथ माशेलकर, औरंगाबादचे अनिरुद्ध गरुड, लातूरचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव, डॉ. अनिल पाटील आदी तज्ज्ञ उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews